
(Image Credit: Unknown source from the web)
धर्म डगमगत होता आणि संस्कृती अंधारात हरवत होती… तेव्हा इतिहासाने एक निर्णय घेतला – आणि एका स्त्रीच्या रूपाने न्याय, करूणा आणि शक्ति यांचा अवतार घडवला.
३०० व्या जयंतीवर्षानिमित्त अहिल्याबाईंची नव्याने ओळख करून घ्यायचे ठरवले. जसे जसे त्यांच्याबद्दल वाचले तसे तसे –
“यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥”
असे म्हणणाऱ्या श्रीकृष्णाची आठवण येऊ लागली. एका विधवा स्त्रीने प्रजेच्या कल्याणासाठी जेव्हा न्याय आणि धर्मसेवेचा समतोल राखला, सर्वसामानतेचा आणि आधुनिक विचारांचा झेंडा आणखी उंच धरण्यास हात दिला, भारतभरात उध्वस्त केल्या गेलेल्या अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार करून सनातन धर्माचा मोडू पाहणारा पाय पक्का केला – तेव्हा ती त्या काळासाठी ‘धर्म पुनर्स्थापक’ श्रीकृष्णाचे एक रूपच ठरली.
“अहिल्या” – या नावातच आहे संयम, तपस्या आणि पुनरुत्थानाची एक अद्भुत कथा!
ती रामायणात एक दुर्बळ, पण नंतर तेजस्वी रूपात परावर्तित झालेली स्त्री म्हणून दिसते.
अहिल्याबाई होळकर यांचेही जीवन काहीसे असेच होते. विधवा अवस्थेत आलेले दु:ख, समाजाच्या संकुचित दृष्टीकोनातून उभे राहण्याचा संघर्ष, आणि त्यातून निर्माण झालेली एक प्रजावत्सल, न्यायप्रिय, कर्तबगार राजमाता.
दोघींनाही एकदा झुकावे लागले पण उठताना त्यांनी केवळ स्वतःला नव्हे तर इतरांनाही उभे केले. म्हणूनच ‘अहिल्या’ ही केवळ एक कथा नाही, ती ‘अहिल्याबाई’च्या रूपात इतिहासात साकार झालेली प्रेरणा आहे.
कधी कधी एखादी व्यक्ती इतकी अद्वितीय कार्य करते की समाज तिच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंना वेगवेगळ्या रूपांत गौरवाने ओळखू लागतो. अहिल्याबाई होळकर यांचे जीवन हे याचे उत्तम उदाहरण आहे.
पेशव्यांनी गौरवाने त्यांचा उल्लेख “पुण्यश्लोक महाराणी” असा केला आहे.
पुण्यश्लोक होण्याची उंची गाठणाऱ्या केवळ काहीच लोकांची इतिहासात नोंद आहे. “पुण्यश्लोक” हा शब्द केवळ स्तुतीवाचक विशेषण नाही, तर सत्कर्म, समर्पण, आणि लोककल्याणाच्या प्रतीकाचे एक बिरूद आहे. अहिल्याबाई होळकर यांचे नाव या शब्दाशी कायमचे जोडले गेले आहे, कारण त्यांचे जीवनच एक दीर्घ पुण्यकाव्य होते.
पुण्य म्हणजे सत्कर्म, धर्म, सद्गुणांनी भरलेले जीवन. श्लोक म्हणजे स्तुतिस्थान, प्रशंसा, स्तुतीचे वचन. “पुण्यश्लोक” म्हणजे ज्याच्या पुण्यकर्मांची, सद्गुणांची, जीवनमूल्यांची कीर्ती श्लोकांतून (स्तुतीपर वचनांतून) गायली जाते.
भारतीय संस्कृतीत राजा हा केवळ शासक नसतो, तर तो रक्षणकर्ता मानला जातो. त्याचप्रमाणे, राणी ही केवळ सम्राज्ञी नसून मातृत्वाचे प्रतीक असते. हा भाव फक्त सत्तेच्या सन्मानासाठी नाही, तर तिच्या कणखर निर्णयक्षमतेबरोबरच मायाळूपणासाठी होता. जेव्हा राणी स्वतःला जनतेच्या सुखदुःखात सहभागी करते, त्यांची भूक, पाण्याची व्यवस्था, यात्रा, धर्म, आणि न्याय यांचा सर्वार्थाने विचार करते तेव्हा ती जनतेसाठी केवळ “राणी” राहत नाही, तर आईसारखी वाटते. म्हणूनच अहिल्याबाई होळकर या रयतेसाठी नेहमी “मातोश्री अहिल्यादेवी” किंवा “आई” होत्या.
“मातोश्री” हा शब्द केवळ एक सन्मान नाही, ते एक भावनिक नातं आहे. जीवन देणाऱ्या आणि जीवनाचा सांभाळ करणाऱ्यांना आईचा दर्जा भारतीय संस्कृतीत नेहमीच दिला गेला आहे. मग त्यात सजीव निर्जीव लिंगभेद दिसत नाही. नदी आई आहे तर गायही आईच आहे. ज्ञानेश्वरही लोकांची माऊलीच झालेले दिसतात. आईपण नेहमी अंतःप्रेरणेतूनच दिले गेलेले दिसते. त्याच प्रेरणेतून ते अहिल्याबाईंना मिळालेले जाणवते.
युरोप, पश्चिम आशिया किंवा इतर राजतंत्रांमध्ये राणीला “Your Highness”, किंवा “Majesty” म्हणतात पण कोणीही तिला “आई” म्हणत नाही. हे केवळ भारतातच शक्य आहे, कारण इथे माळव्यासारखे एक राज्य एक साम्राज्य नसून, एक कुटुंब मानले गेले.
आज महेश्वर व आजूबाजूच्या भागांमध्ये काही ठिकाणी अहिल्याबाईंची मंदिरे आहेत आणि लोक त्यांची देवी स्वरूपात पूजा करतात. इतिहासात अशा प्रकारे कुठल्याही राणीची पूजा होत नाही.
एकाच व्यक्तीतून माया, शक्ती, कर्तृत्व, करुणा आणि न्याय यांचं संपूर्ण रूप जेव्हा प्रकट होतं, तेव्हा समाज तिचं नाव संज्ञेपलीकडे नेतो. ती फक्त एक राणी उरत नाही तर ती पुण्यश्लोक, मातोश्री, देवी, आणि आई बनते.
अश्या असामान्य व्यक्तींना कदाचित इतिहासच निवडतो. समाजाच्या जखमा भरून काढण्यासाठी आणि न्यायाचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी! ज्यांनी १८व्या शतकाला दिशा दिली, असा दीपस्तंभ – अहिल्याबाई होळकर!
अठराव्या शतकातील त्या काळात हिंदू मंदिरं केवळ पूजास्थळ नव्हती, ती समाजजीवनाची केंद्रस्थाने होती — शिक्षण, न्याय, शरणागत लोकांचा आधार आणि सांस्कृतिक परंपरेचं जतन करणारी ठिकाणं. त्यामुळेच, परकीयांनी सत्ता संपादन करताना मंदिरांवर हल्ला करून धर्म आणि संस्कृतीचं मुळापासून उच्चाटन करण्याचा प्रयत्न त्यांच्या उगवत्या काळात केलेला होता. बदलांच्या वाऱ्यांमध्ये त्या भग्न संस्कृतीला गरज होती पुन्हा उभारू पाहण्याची.
आता एकीकडे मुघल साम्राज्याचा ऱ्हास सुरू झाला होता, तर दुसरीकडे अनेक प्रांतीय सत्ता उगम पावत होत्या. निजाम, रोहिले, अफगाणी यांचेही छोटे मोठे राज्य होते. पोर्तुगीज सत्ता गोवा प्रदेशापुरती मर्यादित झाली होती आणि इंग्रजांची सत्ता हळूहळू वाढत होती. बदलांचे वारे वाहत होते.
भारतामध्ये तेव्हा घडणाऱ्या घटनांचा आढावा घेतला, तर आपल्याला एक काळोखे आणि अस्थिर राजकीय-सामाजिक चित्र दिसते.
अशा परिस्थितीत जवळपास ३० वर्षे अखंड सत्ता सांभाळण्यासाठी तुमच्यात काहीतरी विशेष असावं लागतं. विधवा, एकटी स्त्री असूनही, अहिल्याबाईने इंदूर राज्य अत्यंत न्याय, करुणा आणि दक्षतेने चालवलं.
जरी मराठा वर्चस्व असले, तरी सम्राज्यशाहीच्या काळात युद्ध हीच जीवनशैली होती. जमीनदार, सरदार आणि वतनदार यांच्यात नव्या सत्ता संघर्षांची मालिका सुरू होती. अनेक प्रांतीय सत्ता उगम पावत होत्या.
त्या काळातील लिखित इतिहास हा स्थानिक राजे-रजवाड्यांतील युद्धे, वाद आणि मोहिमा यांमध्ये गुंतलेला आहे. अश्यात अराजकतेच्या केंद्रस्थानी असणारे माळवा प्रांतातील अहिल्याबाई होळकरांचे राज्य शांत आणि समृद्ध! शांततेचा इतिहास थोडा कंटाळवाणाच असतो, नाही का? कदाचित त्यामुळेच अहिल्याबाईंबद्दल हव्या तश्या ऐतिहासिक नोंदी उपलब्ध नाहीत. परिणामी, त्यांच्या असामान्य गुणांचं प्रभावी चित्रण करणं हे आपल्याला फक्त त्या वेळच्या परिस्थितीचा विचार करून, किंवा अनुमानावरून केलेल्या वर्णनांद्वारेच शक्य होणार आहे. चला तर आहिल्याबाईंच्या आयुष्याची ओळख करून घेऊया-
अहिल्यादेवींची कथा हि कान देऊन ऐकणाऱ्याला इतिहासातील कोरडी नोंद वाटेल पण प्राण देऊन ऐकणाऱ्याला त्यांच्या पराक्रमाचे हे कीर्ती काव्य एखाद्या शाहिरी पोवाड्यागत भासेल.
अहिल्याबाईंचा उल्लेख करताना मल्हारराव होळकरांना पहिले नमन करणे हे केवळ औपचारिक नव्हे, तर अत्यावश्यक आहे.
मल्हारराव होळकर यांचा जन्म इ.स. १६९३ मध्ये महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील होळ या गावात एका सामान्य धनगर कुटुंबात झाला. त्यांच्या जीवनाची सुरुवात अत्यंत साधी होती, परंतु त्यांची बुद्धी, धाडस आणि निष्ठा या गुणांमुळे ते मराठा सैन्यात झपाट्याने वर चढले.
त्यांनी मराठा सरदार बाजीराव पेशवे यांच्या सैन्यात घोडदळ अधिकारी म्हणून प्रवेश केला. मल्हारराव यांची लष्करी प्रतिभा अफाट होती. त्यांनी उत्तर भारतात मुघलांविरुद्ध मोहिमा करून मराठ्यांची सत्ता प्रस्थापित करण्यात मोठा वाटा उचलला. मराठा साम्राज्याच्या माळवा (मध्य प्रदेश) प्रांताचे ते पहिले सुभेदार होते. इ.स. १७३१ मध्ये छत्रपती शाहु महाराज आणि थोरले बाजीराव पेशवे यांनी मल्हाररावांना इंदूर संस्थानाची जहागिरी दिली. तेथूनच होळकर घराण्याचा पाया घालण्यात आला.
मल्हाररावांच्या पत्नीचे नाव गौतमाबाई असे होते. त्यांच्या एकुलत्या एक मुलाचे नाव खंडेराव असे होते. ऐतिहासिक उल्लेखांनुसार खंडेराव पराक्रमी, शूर आणि युद्धात कुशल असले तरी काही प्रमाणात त्यांच्या स्वभावात हलकेपणा आणि अस्थैर्य होते. राजकारणातही ते फारसे गाढे नव्हते.
अहिल्याबाईंचा जन्म ३१ मे १७२५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव माणकोजी शिंदे आणि आईचे नाव सुशिलाबाई असे होते. वडील गावचे प्रमुख होते. माणकोजी शेती व्यवसाय करीत. अहिल्याबाईंची आई साध्वी आणि धार्मिक विचारसरणीची महिला होती. अहिल्याबाईंचं बालपण खूपच साधं आणि धार्मिक वातावरणात गेलं. त्या लहानपणापासूनच श्रवण, चिंतन आणि भक्ती यामध्ये रमायच्या. त्या काळात स्त्रियांना शिक्षण मिळणं कठीण असतानाही, त्यांच्या वडिलांनी त्यांना वाचन, लेखन आणि धर्मशास्त्राचं शिक्षण दिलं.
त्यावेळचा एक प्रसिद्ध प्रसंग सांगितला जातो. तो असा की, होळकर घराण्याचे संस्थापक मल्हारराव होळकर यांचा एका मोहिमेच्या वेळी चौंडी गावी पाडाव होता. त्यांचं लक्ष तेथे एका लहान मुलीवर पडलं, जी गरीब व श्रमजीवी लोकांसोबत मंदिरात बसून गायन आणि पूजा करत होती. त्या लोकांची विचारपूस करत होती. ती मुलगी म्हणजेच अहिल्याबाई. सामान्य कुटुंबातील या मुलीच्या क्षमतेची जाणीव मल्हाररावांना झाली. अहिल्याबाईंच्या नजरेतील शुद्धता, मनातील सेवाभाव, नम्रता, प्रगल्भता आणि नेतृत्वगुण या सर्व बाबी मल्हाररावांनी हेरल्या. त्यांनी तिला आपली सून म्हणून निवडले. खरे तर त्यांनी तिला केवळ सून म्हणून न पाहता जणू एक भावी सामर्थ्यवान नेता म्हणूनच स्वीकारले. वयाच्या आठव्या वर्षी अहिल्याबाईंचा विवाह खंडेराव होळकर यांच्याशी झाला.
अनेकदा राजघराण्यात स्त्रियांना केवळ परंपरेच्या चौकटीत ठेवले जायचे. मात्र मल्हाररावांनी या परंपरेचा भंग करत अहिल्याबाईंना दरबारातील निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेतले. इतिहासात असा सासरा फार क्वचित सापडेल ज्याने आपल्या सुनेला सामाजिक कुंपणाच्या बाहेर पाडण्यासाठी प्रोत्साहित केले. तिला फक्त मुत्सद्दी राजकारणच शिकवले नाही तर सैनिकी शिक्षणही दिले.
घोडेस्वारी, दांडपट्टा आणि तलवार चालवण्याचे प्रशिक्षणसुद्धा अहिल्याबाईंना खंडेरावांसोबत देण्यात आले. मल्हाररावांनी अहिल्येला सैनिकी मोहिमांचा अनुभव दिला आणि प्रशासन, करव्यवस्था, जनकल्याण या गोष्टींची माहिती दिली. यामुळे पुढे जाऊन अहिल्याबाई केवळ नामधारी शासक नाही, तर एक कुशल योद्धा आणि व्यवस्थापक म्हणून तयार झाल्या.
पुढे अहिल्याबाई आणि खंडेरावांना मालेराव आणि मुक्ताबाई असे दोन अपत्य झाले.
१७५४ मध्ये कुम्हेरच्या लढाईत खंडेरावांच्या निधन झाले. त्या वेळी ते फक्त ३१ वर्षांचे होते. या लढाईत मराठा फौजा आणि भरतपूरचे जाट राजा सूरजमल यांच्यात संघर्ष सुरू होता. कुम्हेरचा किल्ला हा सूरजमल जाटाच्या ताब्यात होता आणि त्याचा वेढा घालण्यासाठी पेशव्यांनी मल्हाररावांच्या नेतृत्वाखाली मोहीम आखली होती.
खंडेराव हे मराठा सैन्याच्या अग्रभागी होते. लढाईदरम्यान शत्रूच्या तोफगोळ्याचा मारा झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. खंडेरावांचा मृत्यू हा अहिल्याबाईंच्या वैयक्तिक जीवनात व भावनिक प्रवासात एक मोठा टप्पा ठरला.
खंडेराव होळकरांच्या अकाली निधनानंतर, अहिल्याबाई विधवा झाल्या. त्या काळी विधवांना समाजात दुय्यम स्थान दिले जायचे. पण मल्हाररावांनी या मानसिकतेला पूर्णपणे झुगारले. त्यांनी समाजाच्या विरोधात जाऊन आपल्या सुनेला पुन्हा सन्मानपूर्वक सार्वजनिक जीवन जगण्याचे सामर्थ्य दिले. त्यांच्या मानसिक आधारामुळे अहिल्याबाई आपली दुःखं बाजूला सारून राज्यकारभारात पुन्हा सक्रिय झाल्या. या घटनेनंतर अहिल्याबाई अधिकच धार्मिक व कर्मशील झाल्या.
आपला मुलगा मरण पावल्यानंतर राज्याचा वारसा थांबवण्याऐवजी मल्हाररावांनी अहिल्याबाईंना अधिकृत वारसदार घोषित केलं. एक स्त्री शासिका म्हणून त्यांचा समाजात स्वीकार व्हावा म्हणून त्यांनी तिच्या बाजूने उघडपणे उभं राहणं ही त्या काळातली क्रांतिकारी गोष्ट होती.
मल्हारराव होळकर हे केवळ एक रणवीर योद्धा नव्हते, तर एक प्रगल्भ, समंजस आणि उदारमतवादी व्यक्तिमत्त्व होते. सामाजिक परंपरांना न जुमानणारी दृष्टी त्यांच्याकडे होती. आजही जेव्हा आपण स्त्री- सशक्तीकरण आणि सामाजिक सुधारणा यांविषयी बोलतो, तेव्हा त्याच्या पायाभरणीत मल्हारराव होळकरांची दूरदृष्टी दिसून येते. त्यांनी आपल्या सुनेला दिलेला आधार केवळ एका स्त्रीला नाही, तर एक युगाला दिशा देणारा होता. त्यांनी अहिल्याबाईंना जो आधार आणि विश्वास दिला, त्यातूनच इतिहासात एक पुण्यश्लोक राजमाता घडली.
मल्हारराव होळकरांचा मृत्यू १७६६ साली झाला. मल्हारराव यांच्यानंतर राज्याची धुरा अनिश्चित झाली.
अहिल्याबाईंचा मुलगा मालेराव याला राज्याची सत्ता मिळाली, पण ऐतिहासिक नोंदीनुसार तो अयोग्य, हिंस्र स्वभावाचा होता.
मालेरावांचा मृत्यू १७६७ मध्ये झाला. त्यांच्या मृत्यूनंतर अहिल्याबाईंनी स्वतः राज्यकारभार स्वीकारला.
मालेरावांच्या मृत्यूनंतर अनेक सरदार आणि वतनदारांनी अहिल्याबाईंच्या सत्तेला विरोध केला.
त्यांनी धैर्याने आणि मुत्सद्देगिरीने राज्यकारभार हाती घेतला. अहिल्याबाईंनी स्वतः सैन्यप्रमुखांची नेमणूक केली, शिस्तबद्ध सैन्य उभे केले. त्यात महिलांच्या तुकडीचाही समावेश होता. त्यांना शस्त्रास्त्र चालवण्याचे प्रशिक्षण, स्व-संरक्षण, आणि गुप्तचरगिरीसंबंधी कौशल्ये दिली जात असत. हे सैन्य केवळ शोभेसाठी नव्हते, तर राज्याच्या संरक्षणासाठी कार्यरत होते.
जरी त्यांचे सैन्य सक्षम होते तरीही मराठा साम्राज्यातील इतर नेत्यांप्रमाणे अहिल्याबाईंनी राज्यविस्तारासाठी स्वतःहून युद्ध केले नाही. त्यांच्या कारकिर्दीत, माळव्यावर कधीही हल्ला झाला नाही, जेव्हा संपूर्ण मध्य भारत सत्तेच्या संघर्षाला तोंड देत होता, सिंहासनासाठी लढाया होत होत्या तेव्हा माळवा स्थिरता आणि शांततेचे केंद्र राहिले. पुढे अहिल्याबाईंनी नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या महेश्वर येथे राजधानी हलवली आणि नव्या दृष्टीने प्रशासन सुरू केले.
अहिल्याबाई दरबारात पाटावर बसून राज्यकारभार करत असत, सिंहासनावर नाही. त्या स्वतःला प्रजांची सेविका मानत आणि हे वर्तन त्या नम्रतेने दाखवत असत.
प्रत्येक दिवसाची सुरुवात त्या प्रार्थना आणि ध्यानधारणा करून करीत आणि त्यानंतर त्या सर्वसामान्य लोकांचा खुला दरबार भरवत. कुणीही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत होते. स्त्रियांनाही दरबारी चर्चा आणि निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्यास संधी होती, हे त्या काळात फार दुर्मिळ होते.
अहिल्याबाईंनी महसूल व्यवस्थेत पारदर्शकता आणली. जमिनीच्या मोजणीपासून ते करसंकलनपर्यंत सर्व प्रक्रियेत सुधारणा केली. अहिल्याबाईंच्या राज्यात अति कर आकारणी किंवा अधिकार्यांचा छळ चालत नसे. त्या नियमित पगार आणि न्याय्य कर यावर भर देत असत. गरिबांची तक्रार त्या स्वतः ऐकून घेऊन न्याय करत.
त्यांनी आपल्या कारकिर्दीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले, ज्यात अपत्यहीन विधवांची मालमत्ता जप्त करणारा पारंपारिक कायदा रद्द करणे समाविष्ट होते.
अहिल्याबाई यांनी त्यांच्या काळात भिल्ल आणि पिंडारी या लुटारू टोळ्यांचा प्रश्न अत्यंत मुत्सद्देगिरीने सोडवला. त्या काळात भिल्ल, पिंडारी, आणि इतर जमाती अनेकदा राज्याच्या सीमांवर आणि डोंगराळ भागांमध्ये वस्ती करून राहात असत. हे लोक अपुऱ्या साधनांमुळे, भूक आणि बेरोजगारीमुळे लुटमारीकडे वळलेले असत.
अहिल्याबाईंनी या भिल्ल आणि पिंडाऱ्यांना शत्रू म्हणून न पाहता समाजाचा एक भाग म्हणून पाहिले. अहिल्याबाईंनी त्यांच्या प्रमुखांशी संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि समाधानाचे उपाय सुचवले. त्यांनी या जमातींना राज्यसेवेत सहभागी करून घेतले. विशेषतः सैन्यात, संरक्षण विभागात आणि सीमावर्ती भागांतील गस्तीदारीमध्ये त्यांना नोकरी दिली. जे सुधारण्यासाठी इच्छुक होते, त्यांना संधी आणि सहकार्य दिलं गेलं. पण जे लुटमार करत राहिले, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली गेली.
अहिल्याबाईंनी माळवा प्रांताला केवळ प्रशासनातच नव्हे, तर कला, सांस्कृतिक, शैक्षणिक, उद्योग आणि व्यापाराच्या दृष्टीनेही एक समृद्ध केंद्र बनवले होते.
अहिल्याबाईंनी देशभरातील कुशल कारागिरांना, शिल्पकारांना आणि वस्त्रोद्योगात पारंगत लोकांना आपल्या राज्यात आणले आणि त्यांना कामासाठी आवश्यक सुविधा आणि सुरक्षा दिली. त्यामुळे इंदूर व माहेश्वर हे कापड उद्योग, खास करून हातमागासाठी (handloom) प्रसिद्ध झाले. त्यांच्यामुळेच ‘माहेश्वरी साडी’ हा आजवर टिकून असलेला खास पारंपरिक उद्योग निर्माण झाला. त्या साड्या सौंदर्य, दर्जा आणि कलाकुसरासाठी आजही प्रसिद्ध आहेत.
व्यापाऱ्यांना आपला व्यवसाय खुल्या वातावरणात करता यावा म्हणून अहिल्याबाईंनी कायदासंघटित व सुरक्षित वातावरण दिलं. चोरी, लूटमार यावर कडक कारवाई केली गेली. त्यामुळे देशभरातून व्यापारी होळकरांच्या राज्यात येऊ लागले.
देशभरात मंदिरं, घाट, विहिरी आणि धर्मशाळा बांधताना स्थानिक कारागिर, शिल्पकार, वास्तुविशारद आणि मजुरांना रोजगार मिळाला. ही कामं धार्मिक प्रेरणेतून झाली असली तरी त्याचा सामाजिक आणि आर्थिक परिणाम खोल होता.
कविता, संगीत, नाटक, धार्मिक प्रवचन यांसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांना अहिल्याबाईंनी दरबारी प्रतिष्ठा दिली. कवी, पंडित, अध्यात्मिक गुरु यांना मानमरातब मिळाला. त्यांचा दरबार म्हणजे विद्वत्तेचे केंद्र होते. अहिल्याबाईंच्या दरबारात देशभरातून पंडित, कवी, शास्त्रज्ञ आणि धार्मिक विचारवंतांना बोलावले जाई. त्यांना मान, प्रतिष्ठा, आणि उदरनिर्वाहासाठी वेतन दिले जाई. त्यामुळे त्यांच्या दरबारात रामायण, महाभारत, वेद, उपनिषदे आणि विविध काव्यरचनांवर आधारित चर्चासत्रं होत. अहिल्याबाई स्वतः अत्यंत धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांनी दरबारात वारंवार प्रसिद्ध ग्रंथांवरील प्रवचनांचे आयोजन केले. शंकराचार्यांचे शिष्य, वैष्णव संप्रदायाचे संत, नाथपंथीय महंत आदींना बोलावून समाजात धर्मचिंतन रुजवलं.
येथे अनंत फंदींचे उदाहरण देता येईल. अनंत फंदी हे वास्तवात विविध लावण्या, पोवाडे लिहिणारे शाहीर होते. असे म्हणतात कि अहिल्यादेवींच्या उपदेशामुळे त्यांनी तमाश्याची कला सोडून, सामाजिक-धार्मिक कीर्तन आणि फटक्यांच्या (उपदेशपर काव्य) मार्गावर आपला कल प्रवाहित केला. अहिल्यादेवींनी त्यांना केवळ कवी म्हणून मान्यता दिलेली नाही, तर सामाजिक चळवळीमधून कलात्मक आणि नैतिक नेतृत्वाची शिकवण देखील दिली.
अश्याप्रकारे माळवा प्रांत हे फक्त शांतता व सुव्यवस्थेचं नव्हे, तर सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचं गौरवशाली प्रतीक होतं.
ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून अहिल्याबाई केवळ आप्त राज्यकर्त्यांकडूनच नव्हे तर शत्रू सत्ताधीशांकडूनही आदराने पहिल्या जात होत्या.
हे सांगणारी एक प्रसिद्ध कथा आहे की – हैदराबादच्या निजामाच्या अधिपत्याखालील प्रांतातील काही प्रजाजनांनी तेथील प्राचीन शिवमंदिराच्या देखभालीसाठी अहिल्याबाईंना विनंती केली. अहिल्यादेवींनी निर्भयपणे निजामाला लिहिले की, हिंदू संस्कृती जोपासणे हे माझे कर्तव्य आहे. त्या प्राचीन शिवमंदिराच्या जिर्णोद्धारासाठी निधी देऊन काम करून घेण्यास त्या इच्छुक असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावर उत्तर देताना निजामाने केवळ मंदिराची देखभाल स्वतः करण्याचे आश्वासन दिले नाही, तर अहिल्याबाईंना “बडी आपा” म्हणजे मोठी बहीण मानतो असे सांगत, त्यांच्या खर्चाबाबत चिंता करू नये असेही कळवले.
धोरणी राजकारणाचा आणि व्यापक दृष्टीकोनाचा हाच तो प्रभाव होता की ज्यामुळे शत्रू सुद्धा त्यांचा मान ठेवत.
केवळ हेच नाही तर भारताच्या कुठल्याही भागात अहिल्याबाईंना कुठल्याही सेवाभावाच्या किंवा धार्मिक कामासाठी स्थानिक राज्यकर्त्यांनी त्यांना कधीही विरोध केला नाही. परराष्ट्र व्यवहाराचे हे केवढे मूर्त उदाहरण आहे. खऱ्या अर्थाने, त्या राजांच्या वर अधिपत्य करणाऱ्या महाराणी होत्या.
त्या काळात जेव्हा रस्ते, वाहतूक आणि संपर्कसाधने मर्यादित होती, तेव्हा देशाच्या कोपऱ्याकोपऱ्यांत इतक्या मोठ्या प्रमाणात चालवलेल्या योजनांसाठी लागणारे व्यवस्थापन, कलाकारांची निवड, सूचनातंत्र, दळणवळण आणि logistics (साठवणूक), supply chain (पुरवठा साखळी) आणि financial management (निधीचे व्यवस्थापन) हे सगळे अहिल्याबाईंनी कुठल्या अद्भुत कौशल्याने केले असेल!
गया, सोमनाथ, द्वारका, रामेश्वर, पंढरपूर, हरिद्वार, बद्रीनाथ, त्र्यंबकेश्वर, अयोध्या, श्रीशैलम् इत्यादी शंभराहून अधिक ठिकाणी अहिल्याबाईंनी शंकर, विष्णू आणि विविध देवी-देवतांच्या मंदिरांचे बांधकाम केले आणि भग्न मंदिरांचा जीर्णोद्धार करून सनातन धर्माचे परिवर्तनकारी पुनरुत्थान केले. हे सगळे त्यांनी आपली वैयक्तिक संपत्ती वापरून करवून घेतले. अहिल्याबाई होळकर यांनी केलेली मंदिर उभारणी ही त्यांच्या भक्तिभावाचा, दूरदृष्टीचा आणि लोकसेवेचा अद्वितीय नमुना आहे. त्यांनी संपूर्ण भारतभर विविध तीर्थक्षेत्रांमध्ये नुसती मंदिरेच बांधली नाहीत तर यात्रेकरूंसाठी धर्मशाळा बांधल्या, नद्यांवर घाट, पाणी योजना, विहिरी आणि पुष्करणी यांसारख्या पाणीयोजना बांधल्या. साधू-संतांना आश्रय देऊन धर्मसंवर्धन केला.
धर्मसंवर्धनातील सर्वात उल्लेखनीय म्हणजे प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिर जे औरंगजेबाने पाडल्यानंतर १११ वर्षांनी म्हणजे १७८० मध्ये अहिल्याबाईंनी पुन्हा बांधून त्याचा जीर्णोद्धार केला.
तसेच सोमनाथ, रामेश्वरम यांसारख्या प्राचीन स्थळांचे नुसते बांधकामच नाही तर धार्मिक वैभव पुन्हा निर्माण करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या अभूतपूर्व योगदानाशिवाय हे संस्कृतीचे केंद्रबिंदू आज कदाचित विस्मृतीत गेले असते. मला अहिल्याबाई अठराव्या शतकातील शंकराचार्यच वाटतात. शंकराचार्य आणि अहिल्याबाई हे एकाच ध्येयाच्या दोन वाटा होते. एकाने विचारांनी आणि दुसऱ्याने कृतीने भारतीय संस्कृतीचे पुनरुज्जीवन केले. म्हणूनच, या दोघांचे योगदान केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहिले नाही, तर ते आजही भारतीय अस्मितेचे स्तंभ आहेत.
अहिल्याबाईंच्या या सर्व कार्यांचा लिखित स्वरूपातील उल्लेख काही प्रमाणात उपलब्ध आहे. “होळकरांची बखर” हे मराठी बखरलेखन होळकर घराण्याच्या इतिहासावर प्रकाश टाकते. देशभरातील अहिल्याबाईंनी जीर्णोद्धारित केलेल्या अनेक प्राचीन मंदिरांमध्ये देणगीदारांचे अभिलेख व शिलालेख आढळतात, त्यात अहिल्याबाईंचे नाव, पदवी आणि जीर्णोद्धाराचा कालावधी नमूद आहे. काशी, सोमनाथ, गया, रामेश्वरम, आणि वाराणसीसारख्या ठिकाणी त्यांच्या नावे मंदिर बांधणी किंवा दुरुस्तीचे शिलालेख सापडतात. तसेच, त्या काळातील प्रशासकीय पत्रव्यवहार, लष्करी अहवाल व इंग्रज अधिकाऱ्यांचे पत्रव्यवहार यांमधूनही त्यांच्या मुत्सद्देगिरीचा आणि राज्यकारभाराचा उल्लेख आढळतो.
१७८० च्या दशकात प्रकाशित “A Memoir of Central India, Including Malwa and Adjoining Provinces” या ग्रंथात Sir John Malcolm यांनी अहिल्याबाई होळकरांचे अत्यंत स्तुत्य आणि न्यायप्रिय राज्यकर्तीच्या रूपात वर्णन केले आहे. त्यात ते लिहितात की त्या कालखंडात हिंदू राजकीय आणि धार्मिक रूढींमध्ये एका स्त्रीने राज्यकारभार सांभाळणे अपवादात्मक होते, मात्र अहिल्याबाईंनी थेट दरबार बसवून लोकशाही न्यायकारभार दाखवून दिला. त्यांनी महिलांच्या पडदा पद्धतीचा परंपरागत नियम न पाळता सार्वजनिक दरबार घेतले आणि शासन चलवले. ते म्हणतात इतिहासात फार थोडे शासक असे आहेत जे इतक्या सद्गुणांनी युक्त होते. अहिल्याबाईंच्या प्रशासनाचे आणि जीवनाचे उदाहरण हे शुद्धता, करुणा, आणि लोककल्याणाचे आदर्श रूप आहे. त्यांच्या कार्यकाळात राजकारण आणि भक्तीचा समन्वय साधला गेला, जो इतिहासात दुर्मीळ आणि आदर्श मानला जातो.
१८४९ मध्ये प्रसिद्ध स्कॉटिश कवयित्री आणि नाटककार Joanna Baillie यांनी “Ahalya Baee” ह्या शीर्षकाचे पुस्तक लिहिले जी अहिल्याबाईंची कवितारूपी जीवन गाथा आहे. ह्या कवितेत अहिल्याबाईंच्या राज्यकारभाराचे आणि साम्राज्याच्या शांततेचे कौतुक केले आहे.
परदेशातल्या एका कवयित्रीनेही अहिल्याबाईंच्या कार्याला इतकी दाद दिली, हे त्यांच्या जागतिक कीर्तीचे प्रतीक आहे.
अलीकड्च्या काळात विक्रम संपत या इतिहासकाराने आपल्या “Bravehearts of Bharat” या पुस्तकात अहिल्याबाईंना “संस्कृती संरक्षक योद्धा” म्हणले आहे कारण त्यांनी तलवारीच्या ऐवजी धर्म, संस्कृती आणि जनकल्याणाच्या मार्गाचा अवलंब केला. त्यांच्या कार्याने भारतीय संस्कृतीची चिरंतन प्रेरणा जपली गेली.
अहिल्याबाई होळकर यांचे जीवन ही केवळ एक ऐतिहासिक लेखन अथवा स्मृती न राहता, ते जाणून घेणे हि एक सद्यकालीन गरज बनली आहे. त्यांच्या जीवनातील प्रत्येक पैलू- वैयक्तिक आयुष्य, सामाजिक समरसता, नेतृत्वगुण, हे सगळेच आजच्या भारतासाठी आणि जगासाठी प्रेरणादायी आहेत. हे सगळे शिकण्यासाठी आजही आहिल्याबाई आम्हाला हव्या आहेत.
अहिल्याबाईंचं कार्य म्हणजे आधुनिक management (व्यवस्थापन) अभ्यासकांसाठी एक जिवंत case study (केस स्टडी) आहे. त्यांच्या कार्यातून आधुनिक व्यवस्थापनाचे मूलतत्त्व, नेतृत्वगुण, धोरणात्मक विचार, आणि सामाजिक जबाबदारी यांचे अत्यंत प्रभावी दर्शन घडते.
अहिल्याबाई होळकर यांनी पती आणि सासऱ्यांच्या निधनानंतर पूर्ण राज्यकारभाराची जबाबदारी एकट्याने आणि निर्धाराने पेलली. संकटसमयी घेतलेले त्यांचे धैर्यशील निर्णय, आणि रयतेच्या विश्वासाला पात्र होणे हे decisive leadership चे (नेतृत्वशैलीतील निर्णायकता) उत्तम उदाहरण म्हणता येईल.
आजच्या व्यवस्थापनशास्त्रात चर्चिली जाणारी inclusivity ची मूल्यं (सर्वसमावेशकता) त्यांनी कृतीतून जपली. त्यांच्या प्रशासनात सर्वसमावेशकतेचा आदर्श होता. स्त्रियांना दरबारात, सैन्यात संधी दिली गेली; दत्तक संततीस वारसाहक्क देणारे कायदे लागू केले गेले. भिल्ल–पिंडाऱ्यांशी त्यांनी केलेला संवाद आणि समावेशक तोडगा हे आजच्या inclusive development चे (समावेशी विकास) मूर्त स्वरूप म्हणता येईल.
माळव्यातील होळकर प्रशासनातील महसूल, न्याय, आणि संरक्षण व्यवस्था ही पारदर्शकतेने आणि शिस्तबद्धतेने चालवली जात होती. ही बाब effective governance (प्रशासनकौशल्य) यांचे उत्कृष्ट उदाहरण ठरते. त्यांच्या दरबारात शिक्षित, प्रामाणिक आणि आधुनिक विचारांचे अधिकारी त्यांच्या क्षमतेनुसार संधी मिळवत. अनेक लेखक, कवी, कारागीर, आणि व्यावसायिक हे अहिल्याबाईंच्या विचारांनी प्रेरित झाले आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे जीवनाला दिशा मिळाली याची साक्ष अनेकांनी दिलेली आहे. आजच्या HR experts साठी (मानव संसाधन तज्ज्ञ) हे मॉडेल मार्गदर्शक ठरेल.
काशीपासून रामेश्वरपर्यंत शेकडो मंदिरं, घाट, धर्मशाळा, विहिरी बांधताना त्यांनी नियोजन, वेळ व संसाधनांचा उत्तम ताळमेळ साधला — हे यशस्वी project management (प्रकल्प व्यवस्थापन) आणि CSR (सामाजिक उत्तरदायित्व) चे आदर्श उदाहरण आहे.
राज्यावरील संकटांची कल्पना करून योग्य निर्णय घेणे, बाह्य आक्रमणांना रोखणे, रयतेचा आत्मविश्वास टिकवणे आणि समाजात शांतता राखणे ही सर्व उदाहरणं Strategic Planning (धोरणात्मक नियोजन) आणि risk management che (जोखीम व्यवस्थापन) मूर्त रूप म्हणता येईल. त्यांनी धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक प्रकल्प राबवले तरीही राज्याच्या तिजोरीवर ताण येऊ दिला नाही. खर्चावर काटेकोर नियंत्रण, दीर्घकालीन नियोजन आणि गुंतवणूक धोरण यामुळे हे शक्य झाले. हे financial management (आर्थिक व्यवस्थापन) कौशल्याशिवाय अशक्य होते.
पुढे जाऊन राजकारणाच्या दृष्टीने अहिल्याबाईच्या कार्याचा अभ्यास करायचा झाला तर मर्यादा उरेल ती फक्त आकाशाची! आज आपण ज्या युगात जगत आहोत, तिथे नैतिकता, पारदर्शक प्रशासन, सामाजिक समता, आणि स्त्रीसन्मान या मूल्यांची अधिकच गरज आहे. हाच तो काळ आहे जिथे अहिल्याबाईंची शिकवण आणि विचारसरणी अतीव प्रस्तुत वाटते. त्यांनी आपल्या राज्यात पारदर्शक आणि न्यायाधारित प्रशासन दिले. कोठेही पक्षपात नाही, जातीपातीत भेदभाव नाही, आणि धर्माच्या नावावर फूट नाही. आजच्या राजकारणात अशी मूल्यं दुर्मीळ झालेली दिसतात.
त्यांची सर्वधर्मसमभावाची भूमिका आजच्या धार्मिक विद्वेषाच्या पार्श्वभूमीवर आदर्श ठरते. त्यांनी बनवलेल्या घाटांवर, धर्मशाळांमध्ये कोणत्याही जाती-धर्माला प्रवेश होता. काशी, गया, रामेश्वर यांसारख्या तीर्थक्षेत्रांत त्यांनी जी मंदिरे आणि सोयीसुविधा निर्माण केल्या, त्या आजही भाविकांना आधार देतात.
अहिल्याबाईंचं जीवन हे स्त्रीसक्षमतेचं प्रतीक आहे. एका विधवा स्त्रीने संपूर्ण राज्य सांभाळणे, पडदा पद्धतीस दूर सारणे, स्त्रियांची युद्ध सेना बनवणे, स्त्रियांना सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय अधिकार देणे हे सर्व त्यांच्या असीम कर्तृत्वाचं दर्शन घडवतं. आजच्या काळात स्त्रीसमानतेसाठी आंदोलने होतात, कायदे बदलले जातात; पण अहिल्याबाईंनी ती समता प्रत्यक्षात घडवून दाखवली होती. स्त्री सक्षमीकरण म्हणजे वेगळे काय?
आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आरोग्य आणि भावनिक सबलता ही काळाची गरज बनली आहे. सततचा ताण, असुरक्षितता, सामाजिक दबाव, अपयशाची भीती यांमुळे अनेकजण मानसिकदृष्ट्या खचून जातात. मानसिक आरोग्याचा विषय ऐरणीवर असताना विचार येतो कि आपल्याच इतिहासात आपल्याला आज पडणाऱ्या प्रश्नांना उत्तरे देऊ शकणारी अनेक उदाहरणे आहेत. अहिल्याबाई होळकर यांचं जीवन आपल्याला मानसिक स्थैर्य आणि भावनिक ताकदीचा एक आदर्श मार्ग दाखवतं.
जेव्हा नशिब साथ देत नाही आणि आयुष्य दिवसागणिक खडतर बनते तेव्हा नुसते स्वतःचेच मानसिक स्थैर्य राखणे अवघड होते. अश्यात फक्त स्वतःला वर उचलून परिस्थितीला तोंड देणे नाही तर स्वतःपलीकडच्या ध्येयासाठी जीवन समर्पित करणे किती अवघड असेल?
बालवयातच लग्न, लवकरच पतीचा आणि सासरच्यांचा मृत्यू, मुलाच्या निधनाने झालेले दुःख हे सगळे त्यांच्या वाट्याला आले. हे संकट कुणाचंही मानसिक संतुलन बिघडवण्यासाठी पुरेसे असेल पण त्या तुटल्या नाहीत, खचल्या नाहीत उलट त्यातून उभ्या राहिल्या, अधिक बळकट झाल्या.
त्या काळात विधवा स्त्रियांसाठी समाजात स्थान नव्हते. पण अहिल्याबाईंनी स्वतःला अबला मानलं नाही, तर मनाच्या बळावर पराक्रमी नेत्या म्हणून घडवलं.
अहिल्याबाईंनी त्यांच्या शोकांनाही सामर्थ्यात रूपांतरित केले. सेवा, निःस्वार्थता आणि साधेपणा हे त्यांच्या भावनिक सुदृढतेचे आधारस्तंभ होते. त्यांनी उभारलेली मंदिरे, घाट, धर्मशाळा, जलव्यवस्था, शिक्षणसंस्था ही केवळ विकासाची कामगिरी नाही; ती एक भावनिकदृष्ट्या स्थिर आणि सकारात्मक मानसिकतेची फळं आहेत. मानसिक आरोग्य म्हणजे केवळ दुःख टाळणं नव्हे, तर त्याला सामोरे जाण्याची क्षमता मिळवणे हे त्यांनी कृतीतून दाखवले.
एकूणच आजची तरुण पिढी, प्रशासन, महिला नेते आणि समाजसुधारक यांच्यासाठी अहिल्याबाईंचं जीवन हे प्रेरणास्थान आहे. त्यांनी दाखवलेला मार्ग आजही तितकाच लागू आहे. त्यांचा इतिहास हा केवळ गौरवगाथा नसून तो आजच्या भारतासाठी एक आधारभूत मूल्यसंच आहे.
एक व्यक्ती एका आयुष्यात कोणकोणत्या रूपात प्रकट होऊ शकते? सगळे अनाकलनीय आहे!
आपला इतिहास हा केवळ भूतकाळ नाही, तर आजचं आणि उद्याचं दिशादर्शन करणारा दीपस्तंभ आहे — म्हणूनच तो नव्याने समजून घेण्याची आज गरज आहे. शाळेतल्या इतिहासाच्या पुस्तकात थोडक्या वेळासाठी जेव्हा मला आहिल्याबाई भेटल्या तेव्हा त्या केवळ एक शिवभक्त शुभ्रवस्त्रावृता साध्वी वाटल्या होत्या. अहिल्याबाईंच्या ३०० व्या जयंतीवर्षानिमित्त त्यांची नव्याने ओळख होताना आज मात्र इतिहासाच्या पानांतून जेव्हा त्यांचा चेहरा डोकावतो, तेव्हा तो केवळ एका साध्वीचा नसतो; दृष्टीकोन बदलला, की दृश्यही बदलतं!
आता अहिल्याबाई मला त्यांच्या नेहमी पुस्तकात पाहिलेल्या ओळखीच्या शुभ्रवस्त्रावृता रूपात नाही तर नऊ शक्तिरूपांचा एकत्रित अवतार असणाऱ्या साक्षात नवदुर्गेच्या नव्या रूपात दिसत आहेत –
१. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात दिसलेला अहिल्येचा साधेपणा आणि देवभक्ती शैलपुत्रीदेवीची आठवण करून देते. २. पतीच्या निधनानंतर विधवेच्या वेषातही त्यांनी सिंहासन स्वीकारलं. या समाजाने त्या काळी किती विरोध केला असेल? पण त्या चालत राहिल्या. त्यांनी देवीच्या ब्रह्मचारिणी अवतारासारखी अपार कठोर साधना, संयम आणि निष्ठा दाखवली. ३. रक्षण करून धैर्य देणारी करणारी चंद्रघंटादेवीचं जणू अहिल्यादेवींच्या रूपात अवतरली असे वाटते जेव्हा त्यांनी आपल्या राज्यात अन्याय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून न्याय व सुरक्षितता प्रस्थापित केली. ४. हजारो मंदिरे, धर्मशाळा, विहिरी, घाट व धर्मिक स्थळांची निर्मिती करणाऱ्या अहिल्यादेवी आपल्या सर्जनशीलतेने विश्वनिर्मिती करणाऱ्या कूष्मांडा देवीप्रमाणेच भासतात. त्यांनी केवळ स्थळं नाही, तर संस्कृती घडवली आणि त्यांच्या कृतीतून सृजन निपजलं! ५. आपल्या राज्यातील जनतेला त्यांनी कायम आईसारखं प्रेम व संरक्षण देऊन रयतेचा सांभाळ करणाऱ्या अहिल्या मातोश्री स्कंदमाता देवीचे मूर्त रूपच दिसत नाही का? ६. भक्तांच्या रक्षणासाठी कठोर रूप घेऊन देवी कात्यायनी झाली. गरज पडल्यास अहिल्याबाईही न्यायासाठी कठोर निर्णय घेत. स्त्रियांचं संरक्षण, सामाजिक सुधारणांसाठी ठाम भूमिका घेऊन त्या कात्यायनी रूपात प्रकट झाल्या आहेत. ७. अहिल्याबाईंनी समाजात सुधारणा केल्या, अंधश्रद्धा, जातीभेद यांचा विरोध केला. त्या जणू कालरात्रीसारख्या अज्ञानाचा अंध:कार दूर करणाऱ्या शक्तिरूपात वावरत आहेत. ८. व्यक्तिमत्त्वात शुद्धता, पवित्रता, नम्रता, व सच्चरित्रता असणाऱ्या अहिल्याबाई महागौरीचे मूर्तिमंत रूपच वाटतात. ९. अहिल्याबाईंनी केवळ आपल्या राज्यापुरती मर्यादा न ठेवता, संपूर्ण भारतात जनहिताचे कार्य केले. असे वाटते कि जणू सिद्धिदात्री देवीच अहिल्याबाईंच्या रूपाने अवतरली आहे.
हि नवदुर्गा काळाच्या रथावर आरूढ होऊन आजही प्रेरणा देतेय!
आणि आता मनात प्रकटलेला ह्या देवीस वंदन करणारा प्रसन्न स्वर मला ऐकू येत आहे –
या देवी सर्वभारतेषु संस्कृतीरूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥

(Image Credit: Unknown source from the web)























